निगडीतील गांजा प्रकरण - पोलिसांना सापडेनात आरोपी: पिंपरी । दि. २७ (प्रतिनिधी)
निगडीतील ओटा स्कीम भागात सापडलेला गांजा पोलिसांनी ताब्यात घेतला खरा, पण तो आणणार्यापर्यंत अद्यापही पोलीस पोहोचू शकलेले नाहीत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर गांजा शहरात येतो, कोणीतरी खबर दिल्यानंतर पोलीस तो ताब्यात घेतात. आठवडा उलटत आला, तरी त्यामागील सूत्रधार हाती का लागत नाहीत, अशी चर्चा आता परिसरात रंगू लागली आहे.
ओटा स्कीम परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा अधिक वावर आहे. याच परिसरात गेल्या आठवड्यात मंगळवारी (दि. २२) ओल्या स्वरूपातील तब्बल ११00 किलो गांजा आढळला. एका जुनाट विहिरीच्या परिसरात हा गांजा असल्याची खबरही परिसरातील कुण्या नागरिकाने नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर निगडीचे पोलीस घटनास्थळी पोहोचले.
जेसीबी आणि ट्रकच्या मदतीने गांजाची पोती हलविण्याची वेळ आल्याने नागरिकांचे डोळेही विस्फारले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर शहरात गांजा येऊनही पोलिसांना त्याची खबर नव्हती हे विशेष. त्याचे नेमके वजन किती भरले आणि बाजारातील आजची किंमत काय हे सांगण्यासही पोलिसांकडून टाळाटाळ होऊ लागली आहे.
गांजा ताब्यात घेऊन उद्या आठवडा पूर्ण होणार असला, तरी तो नेमका कोठून आला हे सांगण्याबाबत पोलिसांकडून असर्मथता दर्शविली जात आहे.
अनेक सराईत गुन्हेगार याच भागात राहणारे असल्याने त्यांच्यापैकीच कोणीतरी गांजा प्रकरणातला सूत्रधार असावा, असा पोलिसांचा संशय आहे. गांजाच्या अधीन झालेल्यांसाठीच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर तो मागविण्यात आला असावा या शक्यतेपर्यंत पोलीस पोहोचले आहेत.
परंतु आरोपींपर्यंत ते पोहोचू शकलेले नाहीत. पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक आणि युनिट तीन गुन्हे शाखेचे पोलीस आरोपींच्या शोधात असले, तरी त्यांनाही ठोस माहिती मिळू शकली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment