Monday, 2 July 2012

धोकादायक वाड्यांबाबत महापालिका उदासीन

धोकादायक वाड्यांबाबत महापालिका उदासीन: पिंपरी । दि. १८ (प्रतिनिधी)

महापालिका क्षेत्रात गावठाण भागांमध्ये अद्यापही पडण्याच्या स्थितीतील धोकादायक जुने वाडे दृष्टीपथास येतात. बाहेर पडल्यास अनेक वर्षांपासून वास्तव्यास असल्याचा हक्क सांगता येणार नाही, अशी भीती भाडेकरूंच्या मनात आहे, तर वाड्याची डागडुजी केल्यास भाडेकरूंच्या दृष्टीने ते फायद्याचे ठरेल, त्यांना बोहर काढणे कठीण जाईल. धोका निर्माण झाल्यास भाडेकरूच निघून जातील, अशा भावनेतून घरमालक वाड्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करतात. महापालिका प्रशासनानेही त्याकडे कानाडोळा केला असल्याचे निदर्शनास येत आहे.

कौलारू घरांच्या जागी आरसीसी मधील बांधकामे होऊ लागली आहेत. काही भागांत जुने वाडे, इमारती अद्यापही दिसून येतात. काही ठिकाणी इमारतींची धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असताना भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील वादामुळे जुने वाडे पाडले जात नाहीत, त्याठिकाणी डागडुजी होत नाही, नवीन बांधकाम करण्यासही अडचणी येत आहेत. वर्षानुवर्षे रहाणारे भाडेकरू थेट घरमालकाच्या विरोधात जाण्यास धजावत नाहीत. घर सोडल्यास नुकसान होईल. महागाईच्या काळात अन्यत्र घर घेणे परवडणार नाही, त्यामुळे नाइलाजास्तव आहे त्या परिस्थितीत दिवस कंठत असल्याची परिस्थिती अनेक ठिकाणी पहावयास मिळते. मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम २६५ नुसार महापालिकेने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर केवळ जाहीर प्रकटन दिले आहे. ज्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत, त्यांची तज्ज्ञ अभियंत्यांकडून तपासणी करून त्यांच्या सूचनेनुसार दुरुस्तीसाठी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

No comments:

Post a Comment