Monday, 10 September 2012

पं. शिवकुमार शर्मांना आशा भोसले पुरस्कार

पं. शिवकुमार शर्मांना आशा भोसले पुरस्कार: पिंपरी। दि. ७ ( प्रतिनिधी)

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचा ‘आशा भोसले’ पुरस्कार जगप्रसिद्ध संतूरवादक आणि ख्यातनाम संगीतकार पं. शिवकुमार शर्मा यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पुरस्काराची घोषणा झाली.

नाट्यपरिषद शाखा, पिंपरी-चिंचवड, कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धीविनायक ग्रुपचा हा पुरस्कार परिषदेचे शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी जाहीर केला. १ लाख ११ हजार रुपये रोख, शाल आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखालील राजेशकुमार सांकला, डॉ. रवींद्र घांगुर्डे, विजय जोशी आणि डॉ. वंदना घांगुर्डे यांच्या निवड समितीने पं. शिवकुमार यांची पुरस्कारासाठी निवड केली. पुरस्कार वितरण सोहळा लवकरच चिंचवड येथे होणार असल्याचे भोईर यांनी कळविले आहे. देशपातळीवर संगीतक्षेत्रात अजोड कामगिरी करणार्‍यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येतो. पहिला पुरस्कार २00२ मध्ये ‘आनंदघन’ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी स्वीकारला होता. नंतर खय्याम, रवींद्र जैन, बाप्पी लाहिरी, प्यारेलाल, कल्याणजी, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक आणि शंकर महादेवन या दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जम्मू येथे १३ जानेवारी १९३८ रोजी जन्म झालेल्या शिवकुमार यांना वयाच्या ५ व्या वर्षी वडिलांनी गायन व तबला वादन शिकवण्यास सुरुवात केली. जम्मू-काश्मिरमधील संतूर हे लोकवाद्य वाजविण्यास त्यांनी १३ व्या वर्षी प्रारंभ केला. त्यावर प्रभुत्व मिळवीत त्यांनी संतूरला विश्‍वकिर्ती मिळवून दिली.

१९५५ मध्ये मुंबईत पहिला जाहीर वादनाचा कार्यक्रम केला. व्ही. शांताराम यांचा ‘झनक झनक पायल बाजे’ या संगीत नृत्यमय चित्रपटात त्यांनी एका दृष्यासाठी पार्श्‍वसंगीत दिले. त्याची स्वतंत्र ध्वनी तबकडी १९६0 मध्ये प्रसिद्ध झाली. विख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्यासमवेत १९६७ मध्ये ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा दज्रेदार अल्बम त्यांनी दिला. ‘सिलसिला, चांदणी, डर, लम्हे, फासले आदी चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत गाजले.

No comments:

Post a Comment