उपमुख्यमंत्र्यांनी पुसली कार्यकर्त्यांच्या तोंडाला पाने: पुणे।दि. ८ (प्रतिनिधी)
पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सव ही देशविदेशातील गणेशभक्तांसाठी उत्साह व आनंदाची पर्वणी असल्याने उत्सवकाळात १0 दिवस लाऊडस्पीकरला मध्यरात्रीपर्यंत परवानगी मिळावी, अशी शहरातील गणेश मंडळांनी केलेली मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुडकावून लावली. सण-उत्सवांत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी असलेल्या शासकीय अध्यादेशात कुठलाही बदल करण्यास त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. उपमुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवात फक्त पाच दिवसच परवानगी देण्याची तयारी दाखवून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या तोंडाला अक्षरश: पाने पुसली.
गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी आज शांतता समिती व गणेश मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. तिला महापौर वैशाली बनकर, खासदार सुरेश कलमाडी, अँड. वंदना चव्हाण, आमदार गिरीश बापट, मोहन जोशी, बापू पठारे, माधुरी मिसाळ, अँड. जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे, महापालिका आयुक्त महेश पाठक, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, जिल्हाधिकारी विकास देशमुख, सहपोलीस आयुक्त संजीव सिंघल यांच्यासह नगरसेवक व प्रमुख गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्याचे वैभव असलेला गणेशोत्सव उत्साह व जल्लोषात साजरा करण्यासाठी राज्य सरकारने सण-उत्सवांसाठी राखीव असलेल्या १५ दिवसांच्या परवानगीतील १0 दिवस द्यावेत, अशी गणेश मंडळांची मागणी आहे. शासकीय आदेशात बदल करून पुण्यासाठी संपूर्ण १0 दिवस उत्सव साजरा करण्यासाठी द्यावेत, अशी समस्त पुणेकरांची मागणी आहे. गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या याबाबतच्या भावना अधिक तीव्र आहेत. आमदार माधुरी मिसाळ यांनी कार्यक्रमात त्या व्यक्त केल्या. गुजरातमध्ये नवरात्र उत्सवात पूर्ण ९ दिवस परवानगी दिली जाते, तर पुण्यात का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गेल्यावर्षी उत्सवाच्या परवानगीचे शिल्लक असलेले चार दिवस वाढवून द्यावेत, अशी मागणीही आमदार मिसाळ यांनी बैठकीत लावून धरली. कार्यकर्त्यांच्या भावनांची दखल घेऊन उपमुख्यमंत्री गणेशोत्सवाची भेट देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, उपमुख्यमंत्र्यांनी या मागणीबाबत चर्चाही शक्य नाही असे सांगितले.
पवार म्हणाले, सण, उत्सवाच्या परवानगीसाठी राज्यसरकारकडे १५ दिवसांचे अधिकार आहेत. गणेशोत्सवाला त्यातील दोन दिवस दिले असून जिल्हाधिकार्यांच्या अधिकारातील महाराष्ट्र दिनाचा १ दिवस देण्यात आला आहे. त्यापेक्षा जास्त दिवस वाढवून देता येणार नाही. सवाई गंधर्व महोत्सवाला एक दिवस द्यावा लागतो.
शिवजयंती, ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, नवरात्र, दसरा, दिवाळी, ख्रिसमस अशी सणांची जंत्रीच उपमुख्यमंत्र्यांनी वाचून दाखविली. या सण, उत्सवांच्या परवानगीचे दिवस गणेशोत्सवाला देण्यास त्यांनी असर्मथता दर्शविली. मिरवणुकीतील दोन गणेशमंडळाचे अंतर कमी करण्यासाठी पोलीस व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावा, अशी सूचना करत मूळ प्रश्नाला त्यांनी बगल दिली.
No comments:
Post a Comment