दिवसा पाहणी; रात्री काम फत्ते: पराग कुंकुलोळ। दि. १२ (चिंचवड)
भोईरनगरच्या विठ्ठल मंदिरातून समई, त्याच्या शेजारच्या दुकानातून रेडिओ चोरला होता. इंदिरानगरच्या किराणा दुकानातून तांदळाचे पोते, तर प्रेमलोक पार्कच्या बंद शाळेतून वायर चोरल्या.. चिंचवड परिसरात नागरिकांनी पकडलेल्या लहान मुलाला विश्वासात घेतल्यावर त्याने दिलेली ही माहिती. पोलिसांनी एकदा पकडून नेले. चोरीचा माल घेणार्या भंगार व्यावसायिकाचे दुकान दाखविले. त्यानंतर मला जाण्यास सांगितले. कोठे, केव्हा, कोणता माल हाती लागेल याचा अंदाज घेऊनच चोरीचा मनसुबा सिद्धीस नेला जातो, असेही त्याने सांगितले.
जोखीम उचलण्यापूर्वी परिस्थितीचा अंदाज घ्या हे साधे तंत्र चोरी करताना पकडले जाऊ नये, याकरिता बालगुन्हेगारांनी आत्मसात केले आहे. जेथे चोरी करावयाची तेथे आधी टेहळणी केली जाते. काय हाती लागेल याचा अंदाज घेतला जातो. मगच चोरी केली जाते.
बालगुन्हेगारांचे टोळके एखाद्या परिसरात बंद घरांची, दुकानांची दिवसा पाहणी करते. काहीवेळा एका दिवसात काम फत्ते केले जाते. तर काही जोखमीच्या ठिकाणी दोन-तीन दिवस चकरा मारून केव्हा आणि कसा हात मारायचा याचा अंदाज घेतला जातो. शक्यतो रात्रीच्या वेळीच चोरी केली जाते.
दुकानांचे, टपर्यांचे पत्रे, मागील दरवाजा उचकटून ते सहज आत जातात. त्यांचे दोन सहकारी कानोसा घेण्यासाठी बाहेर थांबून राहतात. चोरी करण्यासारख्या वस्तू, पैसे हाती लागले की धूम ठोकतात. चोरीचा माल बर्याचदा पुनर्वसन प्रकल्पांतर्गत दळवीनगर परिसरात बांधलेल्या पत्राशेडमध्ये ठेवला जातो. दुसर्या दिवशी ठराविक भंगार व्यावसायिकाला देऊन त्याच्याकडून पैसे घेतले जातात. हेक्सॉ ब्लेड, स्क्रू ड्रायव्हरच्या सहायाने परिसरातील रोहित्रांची झाकणे व केबल कापून तिची विक्री केली जात असल्याची माहितीही पुढे येत आहे.
No comments:
Post a Comment