Saturday, 13 October 2012

‘नकोशी’साठी बालस्केटर्सचा धावा

‘नकोशी’साठी बालस्केटर्सचा धावा: स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी पुणे ते मुंबई प्रवास
पुणे। दि. १२ (प्रतिनिधी)

स्त्रीभ्रूणहत्येविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी अवघ्या ५ वर्षांपासून १४ वर्षांपर्यंतची २0 मुले पुणे ते मुंबईचा प्रवास स्केटिंगवरून करणार आहेत. बालदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. १0 नोव्हेंबरला पुण्यातून हा उपक्रम सुरू होणार असून, १४ नोव्हेंबरला गेट वे ऑफ इंडियाला मुले पोहोचणार आहेत, अशी माहिती दि अँडव्हेन्चर हबचे अध्यक्ष सुरेश बाबू यांनी दिली.

या वेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व या टीमचे नेतृत्व करणारी मनाली बाबू उपस्थित होते. सुरेश बाबू म्हणाले, स्त्रीभ्रूणहत्येचे लोण समाजात मोठय़ा प्रमाणात पसरल्याचे दिसून येत आहे. त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुले अद्वितीय साहस करू शकतात, हेही या उपक्रमातून दिसून येणार आहे. यामध्ये स्केटिंग करणारे पुण्यातील १0 मुले आणि अंबरनाथ येथील १0 मुले सहभागी होणार आहेत. या उपक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार अविनाश इनामदार, गायक शंकर महादेवन, सलील कुलकर्णी सहभागी होणार आहेत.

१0 नोव्हेंबरला बालगंधर्व रंगमंदिरापासून या स्केटिंगला झेंडा दाखवून सुरुवात केली जाणार आहे. ११ नोव्हेंबरला ही मुले पुण्याहून निघून पिंपरी-चिंचवड-तळेगाव दाभाडे मार्गे लोणावळा येथे पोहोचतील. १२ नोव्हेंबरला लोणावळ्यापासून खोपोलीमार्गे पनवेल येथे पोहोचतील. १३ नोव्होंबरला पनवेलहून निघून वाशी मार्गे दादरला पोहोचतील. १४ नोव्हेंबरला दादरहून गेट वे ऑफ इंडिया येथे या उपक्रमाचा समारोप होणार आहे.

No comments:

Post a Comment