Monday, 12 November 2012

बोगस शिधापत्रिका रद्द करण्याचे आदेश

बोगस शिधापत्रिका रद्द करण्याचे आदेश: - दोषी अधिकार्‍यांवरही कारवाई करणार; जिल्हाधिकारी देशमुख यांनी घेतली दखल पुणे। दि. ४ (प्रतिनिधी)

बोगस शिधापत्रिकांच्या प्रकाराची जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून, बोगस शिधापत्रिका तत्काळ रद्द करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच दोषी दुकानदारांबरोबरच अधिकार्‍यांचीही गय केली जाणार नसल्याती तंबीही त्यांनी दिली.

‘लोकमत’ने बोगस शिधापत्रिकांचा प्रकार नुकताच उघडकीस आणला. त्यात येरवड्याच्या परिमंडळ ई मधील एका रास्त धान्य दुकानदाराकडे १0७ शिधापत्रिका दुबार (एकाच नावावर दोन शिधापत्रिका) आढळल्या आहेत. तर पिंपरी-चिंचवड व निगडी परिसरातील तपसाणी केलेल्या १६ हजार ६५४ पैकी ९ हजार ८८१ बोगस शिधापत्रिका कारवाईत रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे.

शहरात राबविण्यात आलेल्या बोगस शिधापत्रिका शोधमोहिमेत २ लाख ७0 हजार शिधापत्रिका रद्द झाल्या आहेत. शोधमोहीम संपल्यानंतरही बोगस शिधापत्रिका सापडत असल्याचे लोकमतने उघड केले. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी शहर व जिल्हा अन्नधान्य पुरवठा अधिकार्‍यांची शनिवारी बैठक घेतली. त्यात त्यांनी बोगस शिधापत्रिका असणारे दुकानदार व त्यांना मदत करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांची गय केली जाणार नसल्याचे सांगितले.

बोगस शिधापत्रिकांवर तत्काळ कारवाई करून त्या रद्द कराव्यात, संबंधित दुकानदारांवर, तसेच बोगस शिधापत्रिकांना धान्याची उचल देणार्‍या अधिकार्‍यांवरही कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिल्या आहेत.

बोगस शिधापत्रिकांचा प्रकार घडलेल्या दुकानांची गत पाच वर्षांची दप्तर तपासणी केली पाहिजे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्रयस्थ समितीमार्फत चौकशी करण्यात यावी. दोषी अधिकारी व दुकानदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून अपहार झालेल्या धान्याच्या रकमेची त्यांच्याकडून वसुली करावी.

- जयप्रकाश उणेचा, माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते

No comments:

Post a Comment