त्या मातेचा आनंद गगनात मावेना!: पिंपरी । दि. ८ (प्रतिनिधी)
रात्री अकराला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात एकापाठोपाठ पोलिसांच्या गाड्या आल्या. आता काय नवीन राडा झाला, असा प्रश्न येथील लोकांच्या मनात उभा राहिला. क्षणार्धात पोलीस उपायुक्त व त्यांची टीम बाळाला घेऊन उतरली. चोरीला गेलेले मूल सापडल्याने अपर्णा पोखरकर यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्वांनी पोलीस यंत्रणेला धन्यवाद दिले. कुटुंबीयांनी जल्लोष केला.
अर्भक चोरीच्या घटनेनंतर ‘लोकमत’ने नागरिकांना माहिती कळविण्याचे आवाहन केले होते. गेले तीन दिवस सातत्याने या घटनेचा पाठपुरावा केला होता. तसेच वायसीएममधील ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न मांडला होता. तीन दिवस बाळाचा शोध लागत नसल्याने पोलीस यंत्रणेला माध्यमांनी लक्ष्य केले होते. या प्रकरणावर आज रात्री पडदा पडला.
या घटनेची उकल झाल्याचा सुगावा माध्यमांना लागल्याने वायसीएममध्ये गर्दी झाली होती. पोलिसांचे पथक बाळाला घेऊन पहिल्यांदा तळमजल्यावरील प्रसूती वॉर्डात गेले. बालरोगतज्ज्ञांना बाळ दाखविण्यात आले. त्याची तब्येत चांगली असल्याचे सांगितल्यानंतर पोलीस व माध्यमांच्या गराड्यात पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी बाळाला कुशीत घेतले. तेथून हे सर्वजण पाचव्या मजल्यावरील वॉर्डात पोहोचले. ज्या ठिकाणी पोखरकर होत्या, त्या खोलीत प्रवेश केला. बाळाला पाहून पोखरकरांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यांना बोलताही येईना. ‘आपले आभार कसे मानू’ एवढेच त्या वारंवार म्हणत होत्या. तर रुग्णालयाबाहेर पोखरकरांचे नातेवाईक जोरदार घोषणा देत होते. ‘शिवाजीमहाराज की जय, पोलिसांचा विजय असो.’ मुलगा मिळाल्याने सर्वांच्या चेहर्यावर आनंद होता. दरम्यान, यामुळे वॉर्डातील सर्व रुग्णही जागे झाले. त्यांनीही आनंद व्यक्त केला.
No comments:
Post a Comment