Sunday, 9 December 2012

विवाह सोहळ्यांमुळे मनपा ओस

विवाह सोहळ्यांमुळे मनपा ओस: पिंपरी । दि. ७ (प्रतिनिधी)

अधिकारी, पदाधिकारी तसेच नगरसेवक विविध ठिकाणच्या विवाह सोहळ्यांना गेले असल्याने महापालिकेत शुक्रवारी दिवसभर शुकशुकाट होता. अधिकारी कक्ष, पदाधिकार्‍यांची दालने रिकामी होती. मंत्री, नेते, खासदार, आमदार आदी व्हीआयपी मंडळींच्या घरातील विवाह समारंभ असल्याने अधिकारी, पदाधिकारी आवर्जून त्या सोहळ्यांना हजर राहिले. त्याचा परिणाम महापालिकेत जाणवला.

खासदार गजानन बाबर यांच्या चिरंजीवांचा विवाह सोहळा रावेत येथे होता, तर पुण्यात बालेवाडी येथे वनमंत्री पतंगराव कदम यांच्या चिरंजीवांचा विवाह समारंभ होता. आमदार बापू पठारे यांच्या घरीही लग्नसमारंभ असल्याने महत्त्वाचे पदाधिकारी आणि अधिकारी महापालिकेकडे फिरकले नाहीत. काही अधिकारी, पदाधिकारी महापालिकेत आले. थोडा वेळ थांबून दुपारी लग्नसमारंभांसाठी निघून गेले. दुपारनंतर महापालिकेत केवळ शिपाई आणि अन्य कर्मचारी दिसत होते. एरवी तिसर्‍या मजल्यावर दिसणारे कार्यकर्तेही कोणी दिसून आले नाहीत.

खासदार बाबर यांच्या चिरंजीवाच्या लग्नसोहळ्यासाठी शिवसेनेसह अन्य पक्षांचे बहुतांश नगरसेवक, कार्यकर्ते गेले होते. शुक्रवारचा विवाहसोहळ्याचा मुहूर्त महापालिकेच्या शुकशुकाटास कारणीभूत ठरला. आळंदीत संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यास शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. त्याचाही परिणाम जाणवला.

महापालिकेत शुकशुकाट, तर बाहेर रस्ते गर्दीने फुलून गेले होते. विविध ठिकाणी लग्न असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वाहने दिसून येत होती. एरवीपेक्षा रस्त्यांवर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ होती. बालेवाडी, बाणेर आणि अन्य ठिकाणी वाहतुकीवर ताण आला. वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला होता.

No comments:

Post a Comment