मेट्रो ट्रॅकवर!: पिंपरी ते स्वारगेटचा पहिला टप्पा १६ किलोमीटरचा
पुणे। दि. ६ (प्रतिनिधी)
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा राबविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला आहे. साधारण १६ किलोमीटरचा हा मार्ग पिंपरीत इलेव्हेटेड व पुणे हद्दीत काही ठिकाणी भुयारी असणार आहे. पुणे मेट्रो रेल कार्पोरेशन व स्पेशल परपज व्हीकल या कंपनीची स्थापन करून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या हद्दीतून जाणार्या मेट्रो मार्गाचा अहवाल दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने (डीएमआरसी) चार वर्षांपूर्वी तयार केला होता. त्या वेळी पहिल्या टप्प्यात पिंपरी-स्वारगेट आणि दुसर्या टप्प्यात वनाझ ते रामवाडी असे मार्ग प्रस्तावित करण्यात आले होते. केंद्र व राज्य शासन प्रत्येकी २0 टक्के, महापालिका १0 टक्के आणि उर्वरित ५0 टक्के खर्च ‘बीओटी’ अथवा ‘पीपीपी’द्वारे कर्जाऊ घेऊन विकसित करण्यात येणार होता. त्यापैकी पुणे महापालिकेच्या हद्दीतून जाणार्या दुसर्या टप्प्याला महापालिका व राज्य शासनाचीही मान्यता मिळाली आहे. परंतु, पहिल्या टप्प्यातील १६ किलोमीटरच्या मार्गावरून दोन्ही महापालिकांचे एकमत होत नसल्याने हा प्रस्ताव रखडला होता.
अखेर पिंपरी महापालिकेच्या हद्दीतून जाणारा ७.१५ किलोमीटरचा मार्ग व ६ स्थानकांचा खर्च महापालिकेने उचलण्याची तयारी दर्शवून मान्यताही दिली. उर्वरित ९.४४ किलोमीटरचा रस्ता पुणे महापालिका हद्दीतून जाणार असून, त्यापैकी ४.६६ किमीचा भुयारी मार्ग राहणार आहे. इलेव्हेटेड मार्गावर ३ आणि भुयारी मार्गावर ४ स्थानके उभारण्यात येणार आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे रेल कार्पोरेशन व एसपीव्ही या कंपनीतर्फे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भूसंपादन, मोबदला देणे, जमीन हस्तांतरण, कर्ज उभारणी व प्रकल्पाचे नियोजन डीएमआरसीच्या सल्ल्यानुसार करण्यात येणार आहे. भुयारी मार्गासाठी तीनपट अधिकचा खर्च येणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment