Friday, 17 May 2013

२२00 फलकांवर कारवाई

२२00 फलकांवर कारवाई: - ‘ड’ प्रभाग कार्यालय हद्दीत सहा महिन्यांत
रहाटणी । दि. १६ (वार्ताहर)

विनापरवाना फ्लेक्स, बोर्ड, होर्डिंग्ज, बॅनर्स लावून शहराला बकालपणा आणण्यास कारणीभूत ठरणार्‍या व्यक्ती, संस्था यांच्यावर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. ‘ड’ प्रभाग कार्यालयाकडून आतापर्यंत २२७१ फ्लेक्स, बॅनर्स, बोर्डवर कारवाई करत २१ हजार ६00 प्रशासकीय शुल्क वसूल केले.

शहराला बकालपणा येईल अशा प्रकारे बोर्ड, बॅनर्स, होर्डिंग्ज, फ्लेक्स लावण्यावर बंदी घालण्यात आली. वाढदिवस, सणाच्या शुभेच्छा अशा अनेक प्रकारच्या फ्लेक्स व बॅनर्सने ठिकठिकाणी चौकात गर्दी होत असे. नेत्याचा वाढदिवस किंवा सणाच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स म्हणजे राजकारण्यांना प्रसिद्धीचे चांगले माध्यम. त्यामुळे शहरातील चौकाचौकांत शेकडो फ्लेक्स लावण्यात येत होते. अशा फ्लेक्सबाजीमुळे अनेक चौकांतील राष्ट्रीय महापुरुषांचे पुतळेदेखील झाकून जात होते. अनेक दुकानदारांच्या दुकानावर एकापेक्षा अनेक कंपनीच्या जाहिरातीचे बोर्ड झळकत होते. १0 चौरस फूट बोर्ड लावण्याची पालिकेची मान्यता असताना अनेक दुकानदारांनी मनमानी करीत वाटेल तेवढे बोर्ड लावले होते. पालिकेने कारवाई करून ‘ड’ प्रभाग कार्यालय हद्दीतील अनेक दुकानांवरील असे अनधिकृत बोर्ड हटविले. रस्त्यावरील विनापरवाना बोर्डही काढण्यात आले. यात खासगी कार्यालयाचे बोर्ड, बांधकाम व्यावसायिकांचे दिशादर्शक फलक, बांधकामाचे प्रसिद्धी करणारे फलक यांवरही कारवाई १ डिसेंबर २0१२ ते ११ मे २0१३ या कालावधीत करण्यात आली. त्यातून २१ हजार ६00 प्रशासकीय दंड वसूल करण्यात आला. जे दुकानगार, जाहिरातदार, विनापरवाना बॅनर्स, फ्लेक्स, होर्डिंग्ज, बोर्ड लावतील त्यांच्यावर यापुढेही कारवाई करण्यात येणार असून, गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होईल, अशा प्रकारे फ्लेक्स लावणे टाळावे, असे पालिका प्रशासन अधिकार्‍यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment