महापालिका कर्मचार्यांच्या सात तक्रारी दाखल: पिंपरी । दि. १३ (प्रतिनिधी)
लोकशाही दिनाच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कर्मचार्यांच्या समस्या आणि अडचणी दूर करण्यासाठी कर्मचारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुख्य प्रशासकीय इमारतीत आज झालेल्या कार्यक्रमास सहायक आयुक्त आशा दुर्गुडे, कामगार कल्याण अधिकारी चंद्रकांत इंदलकर आदी उपस्थित होते.
क प्रभागाशी संबंधित ३ तर, क्रीडा विभाग, दूरसंचार विभाग, अ प्रभाग विद्युत आणि विद्युत मुख्य कार्यालयाशी संबंधित प्रत्येकी एक तक्रारी आज प्राप्त झाल्या. कर्मचार्यांच्या समस्या, अडचणी आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी सहआयुक्त पी. एच. झुरे यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय कर्मचारी तक्रारी निवारण समितीची स्थापना झाली आहे. सदस्य म्हणून सहायक आयुक्त डॉ. उदय टेकाळे, आशा दुर्गुडे, विशेष अधिकारी सुभाष माछरे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांचा समावेश असून, सचिव म्हणून इंदलकर काम पाहत आहेत. महिन्याच्या दुसर्या सोमवारी मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात तक्रारी स्वीकारल्या जातात.
No comments:
Post a Comment