Wednesday, 13 December 2017

‘लोकल’ लोकांसाठी लोकल हवीच

पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहराची सर्वांत गहन समस्या कोणती असेल तर ती म्हणजे सार्वजनिक वाहतूक. दोन्ही शहरांमध्ये मिळून सुमारे ६० लाखांवर लोकसंख्या आहे. केवळ सार्वजनिक वाहतूक कमकुवत असल्याने आज घरटी किमान दोन खासगी वाहने आहेत. दैनंदिन पुणे-पिंपरी प्रवास करणाऱ्यांची संख्या तब्बल पाच लाख आहे. त्यात पीएमपीचा वापर करणारे दोन लाख, पुणे-लोणावळा लोकलने एक लाख आणि उर्वरित प्रवासी स्वतःचे वाहन वापरतात. परिणामी, रस्ते गच्च भरून वाहतात, रोजचे अपघात आहेतच. प्रदूषणाने धोकादायक पातळी केव्हाच ओलांडली आहे. या सर्व समस्येवर उपाय म्हणजे पीएमपी अधिक मजबूत करणे. लोणावळा ते दौंड लोकलच्या फेऱ्या वाढविणे. त्याशिवाय सध्या बीआरटी आणि दोन वर्षांनी मेट्रो येतेच आहे. तुकाराम मुंढे यांच्यामुळे पीएमपी सेवा सुधारली. मात्र, दुसरीकडे लोकल सेवा खालावली. रात्रीच्या तीन लोकल कायमस्वरूपी रद्द केल्यात. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. दुरुस्तीच्या नावाखाली लोकलच्या पाच फेऱ्या रद्द केल्याने परवा तळेगावच्या त्रस्त प्रवाशांनी जोरदार आंदोलन केले. एकीकडे भविष्याचा विचार करून लोकल सेवा वाढविण्याचे नियोजन सुरू आहे. फक्त लोकलसाठीची स्वतंत्र मार्गिका असावी, या दृष्टिकोनातून तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाची आखणी होत आहे. दुसरीकडे प्रवासी नाहीत, असे सांगत लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या जातात. यात कुठेतरी विसंगती आहे. स्वस्त, मस्त आणि जलद प्रवासासाठी अर्ध्या तासाला एक लोकल कशी सुरू होईल, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. रस्त्यावरची वाहतूक कोंडी, अपघात, प्रदूषणाचा ताण कमी करायचा असेल तर हाच एक रामबाण उपाय आहे. लोकांना जे खरोखर गरजेचे आहे ते द्या. लोकलच्या फेऱ्या कमी करून मुस्काटदाबी करू नका.

No comments:

Post a Comment