Thursday, 20 September 2018

लोहमार्गावरील अपघातांना “ब्रेक’ लागेना!

पिंपरी – प्रवासी सुरक्षितता हीच रेल्वेची प्राथमिकता असल्याचे रेल्वे प्रशासन नेहमी सांगते. मात्र, रेल्वे प्रशासनाचा दावा फोल ठरल्याचे अपघातांच्या वाढत्या संख्येवरून दिसून येत आहे. गेल्या चार दिवसात पिंपरी, कासारवाडी व चिंचवड या रेल्वे स्थानकांच्या हद्दीत चार जणांचा बळी गेला आहे. रेल्वे प्रशासनाने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. प्रवाशांच्या चुकांमुळे तर कधी प्रशासकीय यंत्रणेच्या अकार्यक्षमतेमुळे वर्षाकाठी शेकडो प्रवासी मृत्युमुखी पडतात. यात धावती लोकल पकडणे, गर्दीमुळे दरवाजावर उभे असताना हात सटकणे, स्टंट करणे, रेल्वे रुळ ओलांडणे, हेडफोन लावून रुळांवरुन चालणे या आणि अन्य कारणांचा समावेश आहे. रेल्वे रुळ ओलांडताना अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. तर रेल्वेने प्रवास करत असताना बाहेर डोके काढणे महागात पडत असून रविवारी (दि. 16) डोक्‍याला खांब लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. पुणे-लोणावळा दरम्यान पिंपरी, चिंचवड, कासारवाडी या भागात अपघाताचे प्रमाण कमालीचे वाढत चालले आहेत. पुणे-लोणावळा दरम्यान 2016 मध्ये 425, 2017 मध्ये 450 जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. जानेवारी ते 18 सप्टेंबर 2018 पर्यंत 306 जणांचा बळी अपघातात गेला आहे.

No comments:

Post a Comment