Thursday, 22 November 2018

पिंपळे गुरवमध्ये आदिवासी महोत्सव

23 ते 25 नोव्हेंबर असे तीन दिवस विविध कार्यक्रम
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आदिवासी खाद्य व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकात शुक्रवार (दि.23) ते रविवार (दि.25) या कालावधीत करण्यात आले आहे. या महोत्सवात आदिवासी खाद्यपदार्थासह वस्तू विक्रीचे एकूण 30 स्टॉल असणार आहेत, अशी माहिती जैव विविधता व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उषा मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पालिकेच्या विधी समिती कार्यालयात झालेल्या परिषदेस सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी उपस्थित होते. मुंढे यांनी सांगितले की, पवनाथडी जत्रेच्या धर्तीवर या महोत्सवात आदिवासी महिला बचत गटाचे स्टॉल असणार आहेत. महोत्सवात आदिवासी खाद्यपदार्थाची रेलचेल असणार आहे. तसेच, आदिवासी वस्तू व साहित्य विक्रीचे स्टॉल असणार आहेत. महोत्सव सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत खुले असणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी पाचला होणार आहे. या निमित्त शोभा यात्रा काढली जाणार आहे. दररोज सायंकाळी पाचनंतर होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी नृत्य, ढोल, लेझीमसह विविध वादन आणि शाहिरी जलसा होणार आहे. शहरातील नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंढे यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment