शिक्षण उपसंचालकांची खुर्ची टांगली: वेळ देऊनही भेट न दिल्याने आमदार बाबर यांचा संताप
पुणे। दि. २६ (प्रतिनिधी)
वेळ देऊनही त्या वेळेत न भेटल्याचा राग येऊन शिवसेनेचे आमदार महादेव बाबर यांनी प्रभारी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांची रिकामी खुर्चीच छताला लटकावली व त्यांचा निषेध शांततामय पद्धतीने व्यक्त केला.
शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयामध्ये रामचंद्र जाधव यांच्यासमवेत त्यांची भेट ठरलेली होती; परंतु ठरलेल्या वेळी जाधव तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे आमदार बाबर यांचा राग अनावर झाला. आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालकांची कार्यालयातील खुर्चीच छताला लटकावली व जाधव यांचा निषेध केला. यापूर्वीही ४ वेळा संपर्क साधूनदेखील त्यांनी भेट दिलेली नव्हती, असा आक्षेप या वेळी घेण्यात आला. जाधव यांनी, ते न्यायालयात असल्याने वेळेत येऊ शकले नाहीत, असा खुलासा नंतर केला.
याविषयी आमदार बाबर म्हणाले, ‘‘प्रवेशाचा काळ सुरू आहे. अशा वेळी लोकांना विविध अडचणी येतात. सामान्य नागरिक त्यांची भेट घेण्यासाठी धडपडत असतात; परंतु शिक्षण उपसंचालक हे सातत्याने वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करतात. कधी मोबाईल हँग होतो, तर कधी कार्यालयाबाहेर असतात, तर कधी ते न्यायालयात असतात. नागरिकांच्या त्यांच्याविषयी खूप तक्रारी होत्या. यामुळे जर अधिकारी त्याच्या जागेवर बसतच नसेल तर त्यांच्या रिकाम्या खुर्चीचा नागरिकांना उपयोग काय? म्हणून आज त्यांची खुर्चीच लटकावली व त्यांचा निषेध केला.’’
No comments:
Post a Comment