Wednesday, 5 December 2012

अबब... सदनिकाधारकाला तीन लाखाची पाणीपट्टी...

अबब... सदनिकाधारकाला तीन लाखाची पाणीपट्टी...
पिंपरी, 4 डिसेंबर
पिंपरीतील संत तुकारामनगर येथील एका सदनिकाधारकाला महापालिकेने तब्बल 3 लाख 6 हजार रूपयांचे पाणीपट्टीचे बील दिल्याने सदनिकाधारकावर पाणी...पाणी म्हणण्याची वेळ आली आहे.

यासंदर्भात शिवसेनेचे शाखाप्रमुख राजेश कुलकर्णी आणि शाखा उपप्रमुख साहील शहा यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना निवेदन दिले आहे. संत तुकारामनगर येथील नारायण मुल्य यांना महापालिकेच्या या अजब कारभाराचा प्रत्यय आला आहे.

मुल्य यांना प्रत्येक वेळी 700 ते 800 रूपयांपर्यंत पाणीपट्टी येते. मात्र महापालिका पाणीपुरवठा विभागामार्फत 23 नोव्हेंबर रोजी मुल्य यांना तब्बल 3 लाख 6 हजार रूपये पाण्याचे बील पाठविण्यात आले आहे. हे पाणीबिल पाहून मुल्य यांच्या घशाला कोरड पडली.

वास्तविक मुल्य यांच्या रिडींग मीटरवर केवळ 235 रिडींग झाले आहे. असे असताना मीटरवर पूर्वीचे रिडींग 1710 दाखविण्यात आले असून चालू रिडींग 22853 दाखविण्यात आले आहे. पाणीपुरवठा विभागाच्या या निष्काळजीपणामुळे मुल्य कुटुंबाला नाहक मनस्ताप सहन करण्याची वेळ आली. त्यामुळे या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून दोषी अधिका-यांवर कडक कारवाई करावी, असे कुलकर्णी यांनी निवेदनात म्हटले आहे.
mypimprichinchwad.com

No comments:

Post a Comment