२0, २१ फेब्रुवारीला रिक्षा बंदचा निर्णय: पिंपरी । दि. १५ (प्रतिनिधी)
येत्या २0 आणि २१ फेब्रुवारीला रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांवर रिक्षा बंद करण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या रिक्षा संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र रिक्षाचालक मालक संघटना कृती समितीच्या वतीने मुंबई येथील मजदूर युनियनच्या कार्यालयात, महाराष्ट्रातील रिक्षाचालक मालक संघटना प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पुणे येथून महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे बापू भावे, रिक्षा पंचायतचे अमिर शेख, कॅन्टोन्मेंट रिक्षा युनियनचे नूरमोहंमद रंगरेज, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे प्रदीप रावळे, ठाणे येथील संजय भोळे, कोल्हापूर येथील किशोर पवार, पनवेल रायगड येथील बाळा जगदाळे, थोरात, शंकर साळवी, शशांक राव, रवी राव उपस्थित होते. या वेळी राव यांनी रिक्षाचालकांना सामाजिक सेवेचा दर्जा मिळावा, रिक्षाचालकांना सामाजिक सुरक्षा मिळावी, या प्रमुख मागणीसह इन्शुरन्समध्ये झालेली भरमसाठ वाढ, परमिट धोरण आदी प्रश्नांसाठी संप करण्याचा ठराव मांडला. तो मंजूर करण्यात आला. २0 ते २१ फेब्रुवारीला संप करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
रिक्षा बंदला महाराष्ट्र रिक्षा पंचायतने पाठिंबा दिला असून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व रिक्षा संघटनांनी एकत्र येऊन बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष कांबळे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment