Wednesday, 25 December 2013

नाशिक फाटा पूल होऊनही कोंडी

पिंपरी : कासारवाडी, नाशिक फाटा चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम संपत आल्याने रस्ता प्रशस्त झाला आहे. मात्र, पुलाखालील प्रशस्त रस्त्यावर खासगी वाहने व बसेस उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. 
पुलाच्या कामासाठी रस्त्याच्या कडेला लावलेले संरक्षक लोखंडी पत्रेही हटविण्यात आले आहेत. त्यामुळे कासारवाडीतील दोन बाजूचे मार्ग व भोसरीकडे जाणार्‍या मार्गाचा रस्ता प्रशस्त झाल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत आहे. 
या चौकातून मोठय़ा प्रमाणात वाहतूक होते. सकाळी व सायंकाळच्या सुमारास त्यात आणखी भर पडते. रिकाम्या झालेल्या रस्त्यावर तसेच पुलाखालील जागेत खासगी वाहने, बसेस व रिक्षा लावल्या जातात. रात्री तर ही वाहने बिनदिक्कतपणे पार्क केली जातात. पुलाखालील जागा पार्किंगप्रमाणे वापरली जाते. त्यामुळे अडथळा होऊन वाहतूक संथ होते. अपघाताचाही धोका आहे. भोसरीकडे जाणार्‍या रस्त्यावर बस व एसटीसाठी प्रवाशी रस्त्यावर उभे राहतात, त्यामुळे रस्ता अधिक अरुंद होतो. (प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment