पिंपरी चिंचवड महापालिकेत वर्षापूर्वी भाजपची सत्ता आली; पण आजही ते जाणवत नाही. शेळीने वाघाचे कातडे पांघरले म्हणून शेळी वाघ होत नाही. तद्वत राष्ट्रवादीच्याच काही जुन्या मंडळींनी फक्त टोपी फिरवली आणि भाजपचा अंगरखा घातला. अशीच काही मंडळी सत्तेत आल्याने हे चित्र झाले. भाजपचे संस्कार, आचार, विचार याचा कुठेही ताळमेळ नाही. त्याचाच परिणाम सध्या रोज भाजपचे प्रतिमाभंजन सुरू आहे. या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी विकासकामांचा आढावा घेतला; पण त्याहीपेक्षा पक्षाबद्दल रोज येणाऱ्या उलटसुलट बातम्यांबद्दल अधिक चर्चा झाली असे म्हणतात. पक्षाचे खासदार-आमदार आणि महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू होती आणि आजही कायम आहे. भाजपांतर्गत कलह एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने ‘हल्लाबोल’ केल्याने शहराची राजकीय हवा चांगलीच तापली. महापालिका निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांतील एका एका मुद्यावर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते जाब विचारतात. त्यावर समर्पक उत्तर नसल्याने भाजपची पळापळ होताना दिसते. राष्ट्रवादीने प्रश्नांचा भडिमार सुरू केला असताना भाजपचे नेते मूग गिळून बसल्याने लोकांनाही आरोपांत तथ्य वाटते. त्यातच भाजपच्याच राज्यसभा खासदाराकडून महापालिकेतील स्थायी समितीच्या निर्णयांवर जाहीर आरोप झाल्याने आणखीच मनोरंजन झाले.
No comments:
Post a Comment