जनचळवळीत, प्रबोधनात म्हणा की जनमताच्या दबावात आजही बऱ्यापैकी सामर्थ्य आहे. चांगले-वाईट यातील फरक लोकांना कळतो. व्यवस्थित पटवून दिले तर लोकही ऐकतात. आजवर जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणावर नेहमी चर्चा होत आली. कृती मात्र नाममात्र राहिली. पिंपरी चिंचवडकरांनी वाचाळपणा सोडून कृतीवर भर दिला. पर्यावरणाशी निगडित विषयांवर काही वर्षे सुरू असलेल्या प्रबोधनाचा उचित परिणाम या वेळी दिसला. ‘फटाके वाजवू नका’,‘हवेचे प्रदूषण टाळा’, ‘श्वसनविकाराचे शिकारी होऊ नका’,‘कानठळ्या बसणाऱ्या आवाजांनी बधिर होणार का?’ असा संदेश घरघरांत गेला. विविध संस्था संघटनांनी अगदी पोटतिडकीने प्रचार मोहीम राबविली. शाळा-महाविद्यालयांतून व्याख्याने झाली. ‘आम्ही फटाके वाजविणार नाही,’ अशा आणाभाका झाल्या. त्याचे फळ यंदाची दिवाळी एकदम सुखद गेली. फटाक्यांचा आवाज, धूर, कचरा अर्ध्याअधिक प्रमाणात घटला. जनतेनेही करून दाखवले. पिंपरी चिंचवडकरांची मान उंचावणारे चित्र पाहायला मिळाले. यावेळी शहरातील हवा आणि ध्वनिप्रदूषण मागच्या तुलनेत बऱ्यापैकी घटल्याचे खुद्द महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांबाबत सुनावल्याने त्यात आणखी भर पडली. परिणाम चांगलाच झाला. नागरिकांनी फटाके खरेदी न केल्याने शेकडो कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यापाऱ्यांनीही मान्य केले. पर्यावरणविषयक अशाच अन्य काही उपक्रमांमधील शहरवासीयांचा वाढता सहभाग हा हुरूप वाढविणारा आहे.


No comments:
Post a Comment