हत्तीने पाहिला निर्दयीपणा; माणुसकीही!: पिंपरी । दि. ९ (प्रतिनिधी)
माहूताने तिला उन्हातान्हात फिरविले. तिचा उपयोग करून चरितार्थ चालविला. तो मुका जीवही इमानदार. आयुष्यभर मालकाची सेवाच केली. त्याच्या इशार्यावर नागरिकांना सोंडेने सलाम केले, वेळप्रसंगी खेळही करून दाखविले. परंतु हीच हत्तीण गॅँगरिनसारख्या दुर्धर आजाराने जायबंदी झाली तेव्हा तिचा माहूत तिला सोडून परागंदा झाला. कामाची न राहिलेली हत्तीण सांभाळण्याऐवजी तशाच जखमी अवस्थेत विव्हळत सोडून माहुताने निर्दयीपणाचा परिचय दिला. परंतु दुसरीकडे त्याच हत्तीणीची सेवासुश्रूषा करून तिला जीवदान देण्याचे काम ‘माणूसपण’ सांभाळणारे करीत आहेत.
‘दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड के सब को सलाम कर प्यारे’ या ‘हाथी मेरे साथी’ चित्रपटातील या गाण्यातील ओळीचा अनुभव पन्नाशीत आलेली हत्तीण घेत आहे. गॅँगरिनमुळे तिचा उजवा पाय तीन ठिकाणी सडला आहे, तर डाव्या पायाचे हाडही मोडले आहे. जायबंदी झालेली ही हत्तीण दुर्गाटेकडीजवळच्या ओढय़ाजवळ सध्या अखेरच्या घटका मोजत आहे, तर तिचा जीव वाचविण्यासाठी शहरातील प्राणिमित्र, पशुवैद्य प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत.
श्वान प्रशिक्षक बंटी चव्हाण या तरुणाला एका जागरूक नागरिकाने फोन केला. एक हत्तीण दुर्गा टेकडीजवळच्या नाल्यालगत जखमी अवस्थेत पडल्याबाबत सांगितले. तोपर्यंत त्या भागात बराच अंधार झाल्याने हत्तीणीचा शोध घेणे अवघड होते. चव्हाण यांनी मित्र सादिक सय्यद यांना सोबत घेऊन हत्तीणीचा शोध सुरू केला. रात्री साडेदहाला ती ओढय़ाजवळ सापडली. त्यांनी याबाबत स्थानिक नगरसेवक आर. एस. कुमार यांना माहिती दिली. कुमार यांनी पशुवैद्यकीय अधिकारी सतीश गोरे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. चव्हाण यांनी डॉ. गोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हत्तीणीबाबत माहिती मिळाली असून, सकाळीच तिच्या पायाला
बॅण्डेज केल्याचे सांगितले. हत्तीणीला पाणी पाजून चव्हाण जड पावलांनी घरी परतले. जायबंदी झालेल्या हत्तीणीची अवस्था पाहून बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानातील अनिल खैरे यांनी वनविभाग आणि पोलिसांना
त्याबाबत माहिती दिली. उद्यापर्यंत
तिला तेथून हलविण्यात येणार असून, योग्य जागेत आणल्यानंतरच तिच्यावर पुढील उपचार करणे शक्य होणार असल्याचे डॉ. गोरे यांनी सांगितले. माहूत फरार आहे.
हत्तीणीच्या सोईसाठी घातला मंडप
ही हत्तीण आता उपचारांना प्रतिसाद देऊ लागली आहे. परंतु पावसाचे वातावरण आणि उन्हाचा तडाखा यामुळे तिचा आजार अधिक बळावण्याची चिंता या जागरूक नागरिकांना वाटू लागली. हत्तीणीला हलविण्यात आणखी किमान दोन दिवस जाण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली. त्यामुळे तोपर्यंत हत्तीण सुरक्षित राहावी याकरिता चव्हाण यांनी मंडपवाल्याला बोलावून तेथे मंडपाचा निवारा तिला उपलब्ध करून दिला. तहानलेल्या हत्तीणीला पाणी पाजले, तर काहींनी खाण्यासाठी केळी उपलब्ध करून दिली.
No comments:
Post a Comment