Monday, 11 December 2017

नगरसेवकांच्या शिफारशीने शिक्षकांच्या ‘बदल्यांचा’ खेळ

पिंपरी - नगरसेवकांच्या शिफारशीवरून महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागात सध्या ‘बदल्यांचा’ खेळ सुरू आहे. मर्जीतील शिक्षकांची सोय करण्यासाठी वर्षाअखेरीसदेखील बदल्यांचा घाट घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परिणामी बदल्यांच्या ‘राजकारणा’मुळे शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. 
दरवर्षी एप्रिल, मे आणि जून महिन्यात शिक्षकांच्या ‘ऑनलाइन’ बदल्या करण्याचे सरकार आदेश आहेत; मात्र या आदेशाला राजकीय हस्तक्षेपामुळे हरताळ फासला जात आहे. घराशेजारी बदली करण्यासाठी अनेक शिक्षक आमदार, पक्षनेते, नगरसेवकांची दारे ठोठावत आहेत. यंदा १९ शाळांचे एकत्रीकरण केल्यामुळे ऑगस्ट महिन्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजन बदल्या करण्यात आल्या; मात्र हे बदल्यांचे प्रकरण इथवरच थांबले नाही. ऑगस्टपासून सुरू झालेले हे प्रकरण वर्षअखेरीपर्यंत म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंत सुरूच आहे. सेवाज्येष्ठतेनुसार ‘ऑनलाइन’ बदल्या केल्यानंतरही अनेक शिक्षकांनी आपापल्या वॉर्डातील नगरसेवकांच्या, स्थानिक नेत्यांच्या राजकीय शिफारशी आणून स्वतःची पोळी भाजून घेतली. प्रशासनावर राजकीय दबाव टाकून आपपसांतील बदल्यांचा घोळ घातला आहे. 

No comments:

Post a Comment