Tuesday, 9 October 2012

चाकणला पावसाचे पाणी कंपनीत

चाकणला पावसाचे पाणी कंपनीत: चाकण। दि. ३ (वार्ताहर)

येथील आंबेठाण चौकातील उड्डाणपुलाजवळील मोर्‍या बुजविल्यामुळे सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक महामार्ग व सर्व्हिस रस्त्यावर पाणी साचून रस्त्याला ओढय़ाचे स्वरूप आले होते. पावसाचे तुंबलेले पाणी ‘प्रसाद मशिन टूल्स’ कंपनीत घुसल्याने दोन कोटींची मशिन पाण्यात गेली असून, जवळपास ३0 लाख रुपयांचे नुकसान झाले.

येथील उड्डाणपुलाजवळील मोरीचे तोंड बुजवल्यानंतर मागील महिन्यात तहसीलदार जगदीश निंबाळकर व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांनी पाहणी करून तोंड खुले करण्याचे आदेश दिले होते. येथील जागेचे मालक व ग्रा.पं.सदस्य प्रीतम परदेशी यांनी पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त ड्रेनेज व गटारांचे पाणी जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. ती मागणी अधिकार्‍यांनी मान्य करून नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत अडवू नये असे सांगून काम करण्यास सांगितले. परंतु मोरीचे तोंड अद्याप खुले न केल्यामुळे पाण्याचा प्रवाह बंद झाला. सलग दोन दिवस वळवाचा मुसळधार पाऊस पडल्याने अक्षरश: महामार्गावरून पाणी वाहू लागले, तर शेजारील प्रसाद मशिन टूल्स या कंपनीत पाणी जाऊन सीएनसी, बेंडिंग, प्रेस, लेंथ आदी मशीन पाण्यात बुडाली. त्यामुळे बजाज अँाटोला कंपनी माल पुरवू शकली नाही.

पाणी बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने आवारात पाणीच पाणी झाले आहे. याच पाण्यात कंपनीचा ट्रान्सफॉर्मर असून, वीजप्रवाह पाण्यात उतरल्यास जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डिझेल पंप लावून पाणी काढले तरीही पाण्याचा प्रवाह मार्ग बंद असल्याने पाणी काढता येत नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास कंपनीची ऑर्डर बंद होण्याची चिन्हे आहेत. करोडो रुपयांची यंत्रसामग्री घेतलेले कर्ज कसे फेडायचे? अक्षरश: रस्त्यावर यायची वेळ आली असल्याचे कंपनीचे मालक संजय मोरे यांनी सांगितले आहे.

शासकीय अधिकारी, पुढारी, सरपंच हे केवळ भेट देऊन आश्‍वासन देण्यापलीकडे कुठलेही काम करू शकले नाहीत. या रस्त्यावरील मोरीचा मार्ग मोकळा करून पाण्याचा प्रवाह चालू करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. रस्त्यावरील पाणी आता शेजारच्या शेतात व नागरी वस्तीत घुसले असून ते काढण्याची शासनाने सोय केली नाही, तर याच पाण्यात जलसमाधी घेऊ, असा इशारा किशोर शेवकरी यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment