Tuesday, 9 October 2012

परदेशातूनही आयुक्तांचा ‘वॉच’

परदेशातूनही आयुक्तांचा ‘वॉच’: पिंपरी । दि. ४ (प्रतिनिधी)

प्रशिक्षणाच्या निमित्ताने अमेरिका दौर्‍यावर असलेले आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी इंटरनेटच्या माध्यमातून मनपा अधिकार्‍यांच्या संपर्कात आहेत. विविध विभागांच्या प्रमुख अधिकार्‍यांना मेल पाठवून ते कामकाजाचा आढावा घेऊ लागल्याने परदेशात असले तरी त्यांचा मनपा कामकाजावर ‘वॉच’ आहे.

कृती आराखड्याच्या नियोजनानुसार काम करण्याच्या सूचना देऊन आयुक्त परदेश दौर्‍यावर गेले आहेत. वेळोवेळी इंटरनेटच्या माध्यमातून संपर्कात रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. २६ सप्टेंबरला ते अमेरिकेला रवाना झाले. सुरुवातीचे काही दिवस त्यांचे मेल आले नाहीत. आता मात्र प्रमुख अधिकार्‍यांना मेल येऊ लागले आहेत. कामाच्या आढाव्याबाबत माहिती मागवली जात असल्याने ‘मेल’ च्या माध्यमातून संपर्क राहील. हे आयुक्तांचे बोल खरे ठरू लागले आहेत. त्याची प्रचिती घेण्याची वेळ काही अधिकार्‍यांवर आली आहे.

प्रशिक्षण सत्रात बीआरटी प्रकल्प आणि वाहतूक व्यवस्थेबाबत सादरीकरण करावयाचे असल्याने या प्रकल्पाशी संबंधित अधिकार्‍यास मेल पाठवला आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था, नियोजन आणि उपाययोजना याची सविस्तर माहिती पाठवावी, अशा सूचना त्यांनी मेलवरून दिल्या आहेत. आयुक्तांचा कधीही मेल येऊ शकतो. कोणत्याही क्षणी, कोणतीही माहिती मागवली जाऊ शकते, याची जाणीव ठेवून अधिकारी सतर्कता दाखवू लागले आहेत. प्रत्यक्ष हजर नसले तरी आयुक्तांचा प्रशासनावर चांगलाच धाक आहे. हे या निमित्ताने निदर्शनास येऊ लागले आहे.

No comments:

Post a Comment