शहरातील महाविद्यालय, औद्योगिक वसाहत, आयटी पार्कमध्ये तक्रारपेट्या
पिंपरी, 4 फेब्रुवारी
पिंपरी-चिंचवड शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी, औद्योगिक वसाहत आणि आयटी पार्कमध्ये काम करणा-या युवती, महिलांवर होणा-या अन्याय, अत्याचाराच्या तक्रारी निर्भयपणे देता याव्यात, यासाठी पोलिसांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरातील 70 महाविद्यालयाबरोबरच औद्योगिक वसाहत आणि आयटी पार्कमध्ये पोलिसांकडून तक्रार पेट्या बसविण्यात येणार आहेत.
पुणे शहर परिमंडल तीनमध्ये मुली, युवतींसाठी पिंपरी-चिंचवड शहरात स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयामध्ये पोलीस ठाणे, सहायक पोलीस आयुक्त कार्यालय, उपायुक्त कार्यालय, अपर पोलीस आयुक्त कार्यालयाचे दूरध्वनी आणि स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक दर्शविणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. महिला व मुलींची छेडछाड व अत्याचारापासून बचाव करता यावा, याकरिता सोनाली बडवे यांनी कराटे प्रशिक्षक युवकांमार्फत मोफत कराटे प्रशिक्षण सुरू केले आहे.
शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला दक्षता समितीचे पुनर्गठण करण्यात आले. याशिवाय महिला दक्षता समितीमध्ये प्रत्येक महाविद्यालयातील एका युवतीची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात घडणा-या बलात्कार व विनयभंगाच्या घटनांच्या तपासात महिला दक्षता समिती सदस्यांना सहभागी करून घेण्यात येत आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र स्वागत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्या स्वागत कक्षात महिला पोलीस कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पोलीस चौकीत एक महिला पोलीस कर्मचारी दिवसपाळीसाठी नेमण्यात आल्या असून, महिलांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्यात येणार आहे.
महिला व मुलींची छेडछाड रोखण्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंगसाठी 'महिला बीट मार्शल' ची नेमणूक करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी महिला बीट मार्शल गस्त घालणार आहेत.
शहरातील महाविद्यालयात बसविण्यात आलेल्या तक्रार पेट्या प्रत्येक सोमवारी उघडण्यात येऊ तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. तक्रार पेटीत पडलेल्या पत्रांची आणि तक्रारींची खातरजमा करून गंभीर दखल घेतली जाईल. मुली, युवतींनी पुढे येऊन तक्रारी देत द्याव्यात, असे आवाहन पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment