Tuesday 5 February 2013

अपंगांच्या पालखी यात्रेस देहूगावातून प्रारंभ

अपंगांच्या पालखी यात्रेस देहूगावातून प्रारंभ
पिंपरी, 4 फेब्रुवारी
अपंगांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी देहूगावातून अपंग पालखी यात्रेस प्रारंभ झाला. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत ही पालखी यात्रा नेण्याचा निर्धार प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने करण्यात आला आहे. या यात्रेत राज्याच्या विविध भागातून आलेले शेकडो अपंग, मूकबधीर व कर्णबधीर अपंग सहभागी झाले आहे.

अपंगाच्या मागण्यांसदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत मोबाईल फोनद्वारे चर्चा केली. त्यावेळी पुढील सोमवारी यासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले तसेच आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले, तथापि काही मागण्यांबाबत तरी आजच्या आज निर्णय झाला पाहिजे, असा आग्रह कडू यांनी धरला. त्याला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दुपारी तीनच्या सुमारास देहूगावातील गाथा मंदिरापासून पालखी यात्रेस प्रारंभ झाला. देहूगावातून देहूरोड येथे पालखी यात्रा पुणे-मुंबई महामार्गावर आली. अंधार पडेल त्या ठिकाणी महामार्गावर ठिय्या देण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे.

राज्यातील जवळपास ९ टक्के अपंगांच्या विकासाकडे व त्याच्या प्राथमिक गरजांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अपंगांच्या मागण्यांसंदर्भात शासनाला जाग आणण्यासाठी व अपंग बांधवांच्या कल्याणासाठीच हे आंदोलन करण्यात येत असल्याचे आमदार कडू यांनी सांगितले. शासनाचे अंदाजपत्रक ४५ हजार कोटी रुपयांचे असते. त्यातील ३ टक्के रक्कम शासनाने अंपगांच्या विविध योजनांवर खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र, शासन या बाबत गंभीर नसून अवघा अर्धा टक्का निधी खर्च करीत आहे. गेली सहा महिने आम्ही शासनदरबारी या बाबत लढा देत आहोत. राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली आहे. विधानसभेत औचित्याचा मुद्दाही उपस्थित केला आहे. परंतु शासन अपंगांबाबत दुजाभाव दाखवत असल्याबद्दल खंत त्यांनी व्यक्त केली.

अपंग बांधवांना संजय गांधी निराधार पेन्शन योजना, इंदिरा आवास योजना, जातीची अट न ठेवता सवलती मिळाव्यात. प्रत्येक जिल्ह्यात आधुनिक सेवा सुविधांयुक्त स्वतंत्र वसतीगृह, स्वतंत्र कला अकादमी उभारावी आदी २0 मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment