Wednesday, 12 June 2013

शाळा प्रवेशासाठी डोनेशन देऊ नका

शाळा प्रवेशासाठी डोनेशन देऊ नका: पिंपरी : प्राथमिक व माध्यमिक शाळेतील वर्गात प्रवेशासाठी डोनेशन, निधी घेणे हा दखलपात्र गुन्हा आहे. पालकांनी डोनेशन देऊ नये, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या हवेली गट शिक्षणाधिकारी पी. एच. महाजन यांनी केले आहे.

पालकांनी डोनेशन मागणार्‍या संस्थाचालकांविरोधात ३0 दिवसांच्या आत पोलिसांकडे तक्रार दिल्यास कारवाई केली जाते, असे त्यांनी सांगितले.

शहरातील काही प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इमारत निधी, प्रयोगशाळा शुल्क, संगणक अभ्यासक्रम, मैदान आणि विविध नावांखाली वेगवेगळ्या प्रकारचे डोनेशन व निधी घेतला जातो. प्रसंगी पालकांची अडवणूक केली जाते. पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून पालक नाईलाजास्तव रक्कम भरतात. ही रक्कम १0 हजार ते लाख रुपयांपर्यंत असते. काही संस्थांमध्ये यांची पावती दिली जाते. काही ठिकाणी दिली जात नाही. या संदर्भात माहिती अधिकार कायद्याखाली सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पोलकम यांनी शिक्षण मंडळाकडे अर्ज केला होता. खडकी परिसरातील काही शाळा पालकांकडून डोनेशन घेत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

प्रवेशासाठी कॅपिटेशन फी, डोनेशन (देणगी) किंवा निधी घेतल्यास तो दखलपात्र गुन्हा आहे. या संदर्भात पालकांनी ३0 दिवसांच्या आत पोलिसांत तक्रार दिल्यास कारवाई केली जाते, असे महाजन यांनी सांगितले. या प्रकारे तक्रार असल्यास पालकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment