मृत्यूच्या भीतीने शहर रात्रभर जागे!: पिंपरी । दि. २२ (प्रतिनिधी)
आरं बाबा, तुला काही समजलं का? आज रातीला झोपू नगंस. गावाकडंन माझ्या पावन्याचा फोन आला हुता. आज रातीला झोपलास तर काहीतरी आक्रीत घडंल असं सांगत व्हता. राती बाराच्या ठोक्याला जलमाला आलेल्या बाळानं भविष्यवाणी केलीय की, आज रातीला जागले ते जागले आणि झोपले ते कायमचे झोपले.. रात्री एकपासून अनेकांचे मोबाईल खणखणू लागले. ज्याला त्याला असेच फोन येऊ लागल्याने शहरातील अनेक भागांत गलका सुरू झाला. चिल्यापिल्यांसह कित्येक शहरवासी रात्रभर केवळ जागलेच नव्हे, तर रक्षणासाठी रात्रभर देवाचा धावा सुरू ठेवला.
उस्मानाबाद जिल्ह्यात जन्मलेल्या बाळाने भविष्यवाणी केली, यावर बायाबापुड्यांचा सहज विश्वास बसत होता. तर काही शहाणी सवरती माणसं हे काय भलतंच खुल म्हणून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते. तरीही मन मानेना म्हणून अनेकांनी रात्र जागून काढली. ज्याने त्याने कुटुंबातल्या चिल्यापिल्यांसह शेजार्यांनाही अक्षरश: हलवून जागे केले. त्यामुळे शहरातील बहुतांश भागांतील लोंकानी रात्र जागून काढली. उस्मानाबाद, बीड, लातुर, सोलापूर, बुलढाणा, जालना या जिल्ह्यांसह खान्देशातुन रात्रभर फोन सुरू होते.
पिंपरीतील लालटोपीनगर, नेहरूनगर, विठ्ठलनगर, वाकड, काळाखडक, मोशी, रहाटणी, काळेवाडी भागातले लोकही मध्यरात्री उठून बसले. विठ्ठलनगरातील नव्या इमारतींत पुनर्वसन झालेले नागरिकही मुलाबाळांसह खाली येऊन थांबले. पहाटे दोन ते पाचच्या सुमारास हजारो शहरवासी आपल्या परिसरातील रस्त्यांवर गप्पा मारताना दिसून आले. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याबाबत प्रबोधनाचा प्रयत्न केला. मात्र तो फारसा यशस्वी झाला नाही.
No comments:
Post a Comment