Monday, 4 February 2013

युथ कौन्सिलतर्फे 'मारवेल 2013' चे आयोजन

युथ कौन्सिलतर्फे 'मारवेल 2013' चे आयोजन
पिंपरी, 2 जानेवारी
इंदिरा इन्स्टिट्युटमधील काही तरुणांनी एकत्र येऊन यूथ कौन्सिल ऑफ पुणे या सामाजिक संस्थेचीची स्थापना केली आहे. युवावर्गाला एकत्र करत या तरुणांनी 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत 'मारवेल 2013' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून 'महिला सुरक्षा' या विषयावर जनजागृती करण्याचे या तरुणांनी ठरविले आहे.

निगडीतील यमुनानगर येथील प्रबोधकार ठाकरे क्रीडासंकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्‌घाटन शनिवारी (दि. 2) सकाळी इंदिरा इन्स्टिट्युटच्या अध्यक्षा सरिता शंकर यांच्या हस्ते कण्यात आले. इंदिरा इन्स्टिट्युटमधील 19 ते 23 वयोगटातील काही तरुणांनी सामाजिक जाणीवेतून एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली आहे. सर्व उपक्रमांमध्ये महिलांची सुरक्षा यावर भर देण्यात आला आहे.

युथ कौन्सिलतर्फे शहरातील युवक-युवतींसाठी विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले आहे. यामध्ये फुटबॉल, व्हॉलिबॉल, कबड्डी, टेबलटेनिस, बॅडमिंटन, बॉक्स क्रिकेट, कॉप्युटर गेम आदी स्पर्धाचा समावेश आहे. सोमवारी (दि. 4) पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महिला सुरक्षेवर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, आशा शेळके आणि शहरातील काही महिला पोलीस उपनिरीक्षक मार्गदर्शन करणार आहेत. या संपूर्ण उपक्रमातून मिळणारी रक्कम सामाजिक संस्थाना देणगी स्वरुपात दिली जाणार आहे.

युथ कौन्सिलची संकल्पना अक्षय शेळके, शुभम देशमाने, आशिष शेळके, सागर पवार, आशिष तांबोळी यांची असून त्यांनी या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले आहे. सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेविका सुलभा उबाळे, आशा शेळके यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

No comments:

Post a Comment