डॉ. श्रीकर परदेशी यांना पुन्हा धमकीचे पत्र
पिंपरी, 2 फेब्रुवारी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना पुन्हा धमकीचे पत्र आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. डॉ. परदेशी यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात हाती घेतलेली कारवाईची धडक मोहीम थांबविण्यासाठी एका बनावट नावाने धमकी देणारे पत्र टपालाने त्यांच्या कार्यालयात प्राप्त झाले आहे. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी आयुक्तांच्या संरक्षणात वाढ केली आहे. त्यांच्या कार्यालयात तसेच निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. श्रीकर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीमच हाती घेतली. शहरात बेकायदा बांधकामे करणा-या माफियांचे त्यामुळे धाबे दणाणले आहे. ही कारवाई थांबविण्यासाठी बांधकाम माफियांकडून विविध दबावतंत्रांचा वापर करण्यात येत आहे. आयुक्त परदेशी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र 17 जुलै 2012 रोजी आले होते. त्यानंतर आयुक्तांना 24 तास सशस्त्र पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. पोलिसांनी ते धमकीचे पत्र पाठविणा-याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्यापि त्यांच्या हातात काहीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही.
अनधिकृत बांधकामांवरील कारवाई अधिक तीव्र करीत उपमुख्यमंत्री अजित पवार व आयुक्त परदेशी यांनी धमकीच्या पत्राला कृतीने उत्तर दिले. शहरात बेकायदा बांधकाम करणा-या 811 जणांविरुद्ध महापालिकेने फौजदारी गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत 177 बेकायदेशीर बहुमजली बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.
व्यापारी वापराच्या बेकायदा इमारतींनंतर महापालिकेने आता बेकायदा निवासी बांधकामांना नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण पुन्हा तापले आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार विलास लांडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आयुक्तांना कारवाई थांबविण्याचा इशारा दिला होता. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आठ दिवसांत हा प्रश्न सोडविण्याचा अल्टिमेटमही दिला होता. ती मुदत संपून गेली तर अद्याप आमदार महोदय काही रस्त्यावर उतरल्याचे नागरिकांना पहायला मिळालेले नाही.
लोकप्रतिनिधींच्या दबावाबरोबरच बांधकाम माफियांकडून धमक्यांची पत्रे पाठविणे सुरूच आहे. तरी देखील श्रीकर परदेशी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसारच ही कारवाई सुरू असल्याचे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याने लोकप्रतिनिधींची चांगलीच गोची झाली आहे.
आयुक्तांना नव्याने मिळालेल्या धमकीच्या पत्रावर पिंपळे निलख येथील विशालनगरच्या राजेंद्र महादेव घोंगडे पाटील यांचे नाव लिहिलेले असले तरी ते नाव व पत्ता बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे. अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविली नाही तर त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे.
हस्ताक्षरावरून पत्र पाठविणा-याचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलीस करीत आहेत. धमकीचे मागील पत्र पाठविणा-याचा तपास अद्यापि लागलेला नाही. त्यामुळे नवे पत्र पाठविणा-यापर्यंत पोलीस पोहचू शकतील का, या विषयी नागरिकांच्या मनात साशंकता आहे. तूर्त तरी पोलिसांनी आयुक्तांच्या कार्यालयात व निवासस्थानी बंदोबस्त वाढवून प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे.
No comments:
Post a Comment