Monday, 4 February 2013

बालिकेवर सामूहिक बलात्कार

बालिकेवर सामूहिक बलात्कार: - चिंचवडमध्ये ३ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी। दि. ३ (प्रतिनिधी)

महापालिका शाळेच्या बांधकामावरील ३ मजुरांनी तेथील रखवालदाराच्या साडेचार वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. चिंचवड गावात रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. संतप्त जमावाने चिंचवडगाव पोलीस चौकीसमोर जमून या घटनेचा निषेध केला. पोलिसांनी तीन मजुरांना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

भुरा पुरूषोत्तम आदिवासी ( वय १८, मूळ रा. सतना, मध्य प्रदेश), प्रदीप अशोक रावत (२0) आणि अनिल श्रीवास्तव रावत (२१, सर्व राहणार पडवळ आळी, चिंचवड) यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनुसार, महापालिकेच्या वतीने शाळेच्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्याचे बांधकाम सुरू आहे. तेथेच पीडित मुलगी आपल्या आईबाबांसमवेत राहाते. तिचे वडील तेथे रखवालदार म्हणून नोकरीस आहेत.

आरोपी हे या इमारतीचेच बांधकाम करणारे परप्रांतीय मजूर आहेत. ते बाजूच्याच खोलीत राहतात. पीडित मुलगी अंगणात खेळत होती. चॉकलेटचे आमिष दाखवून ते तिला इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर घेऊन गेले. तेथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. मुलगी रडू लागताच त्यांनी तिच्या हातात चॉकलेट घेण्यासाठी दोन रुपये दिले. मुलगी रडत खाली आली. तेव्हा आईने तिची विचारपूस केली. त्या वेळी घडला प्रकार त्यांच्या लक्षात आला. तोपर्यंत दोघे आरोपी पसार झाले होते. परंतु एकजण या कुटंबाच्या ताब्यात सापडला. त्याची चौकशी केली असता त्याने अन्य दोघा साथीदारांनी बलात्कार केल्याची माहिती दिली.

त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत माहिती देण्यात आली. घटनेबाबत कळताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते पोलीस चौकीत दाखल झाले. त्यांनी या घटनेचा निषेध केला. कासारवाडी येथे बालिकेवर बलात्कार करून तिचा खून करणारा अजून पोलिसांना मिळू शकलेला नाही. गेल्या रविवारी भोसरीत सामूहिक बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले. एका रखवालदाराच्या पत्नीला दारू पाजून अन्य दोन रखवालदारांनी तिच्यावर बलात्कार केला. पिंपरी-चिंचवड परिसरातील ही तिसरी घटना आहे. सहायक पोलिस निरीक्षक एन. सी. मिसाळ, उपनिरीक्षक सुरेश माने, अर्जुन पवार तपास करीत आहेत.

पोलीस निरीक्षक कवडे यांना चित्रपट पाहण्यात स्वारस्य
सामूहिक बलात्कार घडला ते घटनास्थळ पोलीस ठाण्यापासून अवघ्या २00 मीटरवर आहे. सहाच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना रात्री १0 पर्यंत मिळत नव्हती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट लोखंडे यांची सुटी असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. तर गुन्हे निरीक्षक संजय कवडे पोलीस ठाण्यातील दूरचित्रवाणीवर चित्रपट पाहण्यात रमले होते. घटनेबाबत त्यांना विचारणा केली असता अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी रात्री पावणेबाराला घटनास्थळाची पाहणी केली.

No comments:

Post a Comment