‘कारवाई’चे उत्तर देणार ?: - पिंपरीत साहेब, बाबा, दादा येणार प्रथमच एकत्र
पिंपरी । दि. ३ (प्रतिनिधी)
सायन्स सेंटर उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार असे ‘बाबा’, ‘दादा’ आणि ‘साहेब’ एकाच व्यासपीठावर येणार आहेत. अनधिकृत बांधकामाविराधातील कारवाई, प्राधिकरणाची लोकनियुक्त समिती, रेडझोन प्रश्न, रखडलेला घरकुलप्रकल्प याविषयी निर्णय घेणार की पुन्हा हे प्रश्न तसेच भिजत ठेवणार? हे येत्या ८ तारखेला स्पष्ट होईल. त्यामुळे आठला होणार्या कार्यक्रमाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये बाबा, साहेब आणि दादा हे एकाच व्यासपीठावर प्रथमच येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. या प्रश्नांविषयी फक्त निवडणुकीपूर्वी व निवडणुकीत चर्चा होते? निर्णय घेऊ, न्याय देऊ? असे सांगण्यात येते, मात्र निर्णय घेतला जात नाही. आता तिनही नेते एकाच व्यासपिठावर येत असल्याने त्यांना या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
तसेच अपक्ष आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन सभेचे कामकाज होऊन देणार नाही, असा इशारा दिला होता. ही कृती अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देणारी आहे, असा आक्षेप घेत सुजाण नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. त्याचबरोबर पिंपरीचे आयुक्त व प्राधिकरणाचे मुख्याधिकारी या दोघांचीही तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आजवरची बांधकामे नियमित करून यापुढील बांधकामांना निर्बंध घालावेत, अशी येथील आमदारांची, नगरसेवकांची मागणी आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांविषयी प्रशासकीय अधिकार्यांच्या कार्यपद्धतीविषयी मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणार्या रेडझोन प्रश्नाबाबत अनेक बैठका होऊनही निर्णय झालेला नाही.
नवनगर विकास प्राधिकरण असतानाही काँग्रेसचा आवाज मुंबईत उठविणारे नेतृत्त्व नसल्याने गेल्या १0 वर्षांपासून समिती झालेली नाही, पालिकेच्या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांना संधी देऊ, असे मुख्यमंत्र्यानी सूचित केले होते.
सध्या शहरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गाजत आहे. आयुक्तांनी राजकीय दबावाला भीक न घालता कारवाई सुरूच ठेवली आहे. येथील सत्ताधारी स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांची तक्रार केली होती. मात्र, उपमुख्यमंत्र्यांनी आयुक्तांची बाजू घेतल्याने स्थानिक नेतेमंडळी अडचणीत आली आहेत. प्राधिकरण विरोधी पक्षांचे वॉर्ड असणार्या थेरगाव, वाकड, चिंचवड परिसरात कारवाई करते. मात्र, इतरत्र करीत नाही, असा आक्षेप शिवसेनेने घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
No comments:
Post a Comment