Monday, 4 February 2013

रेल्वेच्या धडकेने एकाच कुटुंबातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू

रेल्वेच्या धडकेने एकाच कुटुंबातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू
पिंपरी, 3 फेब्रुवारी
डोक्यावर लाकडाचा भारा घेऊन लोहमार्ग ओलांडणा-या देहुरोड येथील एकाच कुटुंबातील दोन महिलांचा रेल्वेच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज संध्याकाळी पाचच्या सुमारास घोरावाडी-बेगडेवाडी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या नागरकोयल एक्सप्रेसची धडक या दोन महिलांना बसल्याने या दोघी जागीच ठार झाल्या तर त्यांच्या सोबत असलेली आणखी एक महिला प्रसंगावधान राखल्याने बचावली.

सुरेखा बबन बिले (वय-21) व मनीषा सुभाष बिले (वय-31, दोघीही रा. शंकरवाडी, देहूरोड) असे या दुर्दैवी महिलांची नावे आहेत. तर प्रसंगावधान राखल्याने कांता बाळू शिंदे (वय-45) ही महिला बचावली आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील शंकरवाडीत राहणा-या मनीषा बिले आणि त्यांची धाकटी जाऊ सुरेखा बिले, कांता शिंदे या तिघी आज सायंकाळी लाकूडफाटा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडल्या. लोहमार्गालगत झुडपातून लाकूडफाटा गोळा करून त्या लाकडाची बांधलेली मोळी डोक्यावर घेऊन तिघीजणी घरी निघाल्या होत्या.

बेगडेवाडीकडून घोरावडी रेल्वे स्टेशनच्या दिशेने लोहमार्गावरून निघाल्या होत्या. त्यामुळे त्यांना लोणावळ्याहुन पुण्याकडे धावणारी रेल्वेगाडी दिसली. त्यामुळे त्यांनी शेजारच्या लोहमार्गावरून चालण्यास सुरूवात केली. त्याचवेळी पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या नागर कोयल रेल्वेगाडीखाली मनीषा बिले व सुरेखा बिले या सापडल्या. तर प्रसंगावधान राखल्याने कांता शिंदे यातून बचावल्या. मनीषा आणि तिची धाकटी जाऊ सुरेखा यांच्या मृत्युमुळे शंकरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment